
SSC HSC Exam 2024 Tentative Timetable: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च 2024 सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या लेखी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान सामान्य आणि बायफोकल तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणार आहे. इयत्ता 10 वी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) पेपर 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
या परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक राज्य मंडळाच्या mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बोर्डाच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अंतिम वेळापत्रकाच्या छापील प्रती नंतर शाळांना दिल्या जातील. विद्यार्थ्यांना अंतिम वेळापत्रकातील तारखांचा संदर्भ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा - SSC-HSC Supplementary Exam Result 2023: दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; 'येथे' पहा निकाल)
प्रात्यक्षिक, तोंडी आणि ग्रेड चाचण्यांच्या तारखाही नंतर जाहीर केल्या जातील, असे बोर्डाने सांगितले आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.