मेड्डीगट्टा धरणाचे 84 दरवाजे उघडल्याने गडचिरोलीत पुरस्थिती, भामरागड 70 टक्के पाण्याखाली
Flood (Photo Credits: Twitter)

राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गेल्या 25 वर्षातील पावसाचा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला आहे. मात्र गडचिरोलीत (Gadchiroli)  तेलंगणा  (Telangana) मधील  मेड्डीगट्टा धरणाचे (Medigadda Barrage)  84 दरवाजे उघडल्याने पुराची स्थिती निर्माण झासी आहे. छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या पाण्यामुळे गडचिरोतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरीही सरकारने येथे पुरस्थिती असल्याचे जाहीर केलेच नाही आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

तेलगंणा मधील मेड्डीगट्टा धरणाचे 84 दरवाजे उघडल्याने 9 लाख 70 हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह पुढे जात आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी थेट गोदावरी नदीला मिळत असल्याने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच इंद्रावती नदीत जगदलपूर येथून पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून भामरागड मधील 70 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. परंतु पाणी ओरसरत चालले असले तरीही खोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तर खोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी येऊन मिळते.(सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती; कृष्णा नदीच्या पातळीत वाढ, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा)

धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे हाल झाले आहेत. तर इंद्रावती नदी ही पतागुडमहून भामरागड, एटापल्ली या तालुक्यापर्यंत वाहते. परंतु धरणाचे पाणी आणि अन्य नद्यांनी मिळून गडचिरोलीला वेढले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सरकारकडून पुरग्रस्तांना मदत मिळणार का असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.