
बीआरएस (BRS) पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने प्रवेश करू इच्छित आहे. यासाठी पक्षप्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM KCR) यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेऊन पक्षाला पुढे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अशात चंद्रशेखर राव पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याची बातमी आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंगळवारी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील प्रख्यात मराठी कवी आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत.
के. चंद्रशेखर राव उद्या (01 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोल्हापुरात पोहोचतील. त्यानंतर ते सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी जाणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या घरी के.चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर चंद्रशेखर राव दुपारी चार वाजता अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जातील आणि तेथून परत हैदराबादला जातील.
शेतकरी समर्थक संघटना असलेल्या महाराष्ट्रस्थित शेतकरी संघटनेने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. शेतकरी संघटनेच्या एका पथकाने शनिवारी राव यांची शेतकऱ्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर भेट घेतली होती.
दरम्यान, राव यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) असे केल्यानंतर राव महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी नांदेड आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाहीर सभांना संबोधित करून त्यांच्या विकासाचे 'तेलंगण मॉडेल' अधोरेखित केले आहे. (हेही वाचा: Crop Insurance: दीड कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीक विमा- धनंजय मुंडे)
मुख्यमंत्री राव यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची पकड निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या पक्षाला ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळत आहे.