शिक्षक भरती (Teacher Recruitment) प्रक्रियेत काहीसा बदल करत ही भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससी (MPSC) मार्फत केली जावी अशी मागणी होत आहे. या मागणीचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे शिक्षक भरती ही एमपीएससी मार्फत घेतली जाणार का? याबाबत उत्सुकता आणि जोरदार चर्चाही सुरु आहे. राज्य सरकारकडून अद्याप तरी हा प्रस्ताव स्वीकारला अथवा फेटाळल्याचे कोणतेच वृत्त नाही. त्यामुळे राज्य सरकार या प्रस्तावावर काय विचार करते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत शिक्षक भरतीही विद्यमान स्थितीत होत असलेल्या भरती प्रक्रियेनुसारच होत राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या शिक्षण आयुक्तलायकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीसुद्धा सकारात्मक असल्याचे समजते. शिक्षक भरती जर एमपीएससी मार्फत करायची असेल तर त्यासाठी भरती प्रक्रियेचे नियम आणि त्याच्या स्वरुपातही काही तांत्रिक बदल करावे लागू शकतात, असेही शिक्षण आयुक्तांचे मत असल्याचे समजते. याला शिक्षण आयुक्तालयाकडून अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. (हेही वाचा, DEBEL, DRDO Recruitment 2022: DRDO, DEBEL मध्ये मोठ्या पदांची नोकरी भरती, मिळवा बड्या पगाराची नोकरी)
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, शिक्षक भरती एमपीएससी मार्फत करण्याबाबत प्रस्ताव आहे. अद्याप या प्रस्तावावर कोणताही विचार झाला नाही. त्यामुळे सध्यास्थितीत तर शिक्षक भरती प्रक्रियेत कोणतेही बदल नाहीत. आतापर्यंत ज्या पद्धतीने शिक्षक भरती पूर्ण केली जात होती. त्याच प्रमाणे शिक्षक भरती पार पडणार आहे. मात्र, आगामी काळात ही भरती एमपीएससी मार्फत घेतली जावी याबाबत विचार सुरु आहे.
काय आहे सध्याची शिक्षक भरती प्रक्रिया?
राज्यात सध्या केली जाणारी शिक्षक भरती पवित्र पोर्टल द्वारे केली जाते. या पोर्टल मार्फत 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची सर्वात मोठी भरती करण्यात आली होती. नियमीत भरती व्हावी तसेच, मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांमुळे शिक्षक भरती व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवत असताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यासाठी एमपीएससी सारखी अनुभवी संस्था काम करु शकली तर अधिक चांगले राहील असा मतप्रवाह आहे.