तरुण भारत दैनिकाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांच्यावर पलटवार; बेताल विदूषकाच्या मागे शिवसेना पळतेय म्हणत टीकास्त्र
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?  या प्रश्नाने राज्यभरात सध्या खळबळ माजली आहे. निवडणुकीच्या आधी भावंडांप्रमाणे वागणाऱ्या शिवसेना (Shivsena)- भाजपा (BJP) महायुतीमधील अंतर्गत वादांमुळे राजकारणात हा तिढा निर्माण झाला असल्याचे म्हंटले जात आहे . यामध्ये मुख्यमंत्रीपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेचा गाडा हाकण्याची जबाबदारी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वीकारत भाजपावर सतत टीकांचा भडीमार सुरु केला आहे.दर दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे मुखपत्र सामना (Saamana) मधून भाजपाला टार्गेट केले जात आहे अशातच आता तरुण भारत (Tarun Bharat) दैनिकाने देखील संजय राऊत यांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. वास्तविक तरुण भारत दैनिकाच्या अग्रलेखात राऊत यांच्या नावाचा थेट उल्लेख नसला तरी शिवसेना एका 'बेताल' आणि 'विदूषका'च्या  मागे पळत आहे असे म्हणताना उपरोधक टीका केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तरुण भारतच्या अग्रलेखात संजय राऊत यांना 'बेताल' आणि 'विदूषक' संबोधण्यात आले आहे. राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही', अशी टीका 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर करण्यात आली.तर 'उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले घट्ट भावनिक नाते हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असताना हा 'बेताल' शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे', असा उपरोधक टोला संजय राऊत यांना लगावण्यात आला आहे.

'तरुण भारत'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

"माध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे. एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल? रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी ९ वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो.

शेतकर्‍यांबाबत सर्वाधिक पुळका आणण्याचा आव शिवसेनेचाच, राममंदिरासाठी सुद्धा लढा दिल्याचा दावा शिवसेनेचाच. या अनेक प्रश्र्नांमध्ये आणखी एक प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा. बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालविली. हा बेताल मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळविण्याच्या मागे लागला आहे."

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेतील वादावर रोहित पवार यांचा सवाल; जर बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची एवढी हिंमत झाली असती का?

दरम्यान, आज 4  नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता संजय राऊत हे राजभवनावर राज्यपाल कोश्यारी भेट घेणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आज चर्चा करणार आहेत या भेटीतून काही साध्य होणार की सध्या सुरु असणारा राजकीय संघर्ष कायम राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.