महाराष्ट्रात सत्ता स्थापनेतील वादावर रोहित पवार यांचा सवाल; जर बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची एवढी हिंमत झाली असती का?
Rohit Pawar Slams BJP Shivsena Over Mahrashtra Government Formation (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Mahrashtra Vidhansabha Elections) पर्व संपून त्याचे निकाल हाती आले मात्र महायुती मधील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर अजूनही समोर आलेले नाही. या सर्व वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शिवसेना (Shivsena)- भाजपाच्या (BJP) भूमिकेवर सवाल केला आहे. निवडणूक पूर्वी भाजपाने  शिवसेनेला दिलेले आश्वासन आता सत्ता स्थापनेची वेळ येताच पलटताना दिसत आहे जर का यावेळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) हयात असते तर भाजपाची एवढी हिंमत झाली असती का असा सवाल रोहित यांनी केला आहे. याशिवाय रोहित यांनी आपल्या पोस्ट मध्ये महायुतीच्या वादाला टार्गेट करत जर का लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढे भांडण होत संसार नीट कसा चालणार अशा शब्दात उपरोधिक टीका केली आहे.

रोहित यांनी पोस्ट मध्ये म्हंटल्यानुसार, सध्या राज्याला दुष्काळ, अतिवृष्टीचा फटका बसला आहे. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला, त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो मात्र भाजप - शिवसेनामध्ये सुरू असणारा वाद लोकशाहीचा अपमान करणारा आहे. तसेच स्वतः एक संतप्त नागरिक म्हणून विचार करताना सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का ? असा प्रश्न पडत असल्याचे देखील रोहित यांनी म्हंटले आहे.

रोहित पवार ट्विट

दरम्यान, सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारचा कालावधी 9 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे तत्पूर्वी राज्याची सत्ता कोणाच्या हाती द्यायची हा निर्णय न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल अशी चर्चा सुद्धा सुरु आहे. या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी राजभवनावावर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली होती.

शिवसेना अन्य पक्षांसोबत मिळून मुख्यमंत्री पद घेणार की पुन्हा  एकदा भाजपासोबत मिळून छोट्या भावाची भूमिका साकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.