Chhagan Bhujbal: मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, त्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. (हेही वाचा -Dr. Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mills: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला)
काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री @ChhaganCBhujbal यांनी घेतली दखल.निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरित करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश pic.twitter.com/r0gFGoxp7q
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 18, 2020
आतापर्यंत राज्यातील अनेक शिधा दुकानदारांची तपासणी करण्यात आली आहे. यात लाखो रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोषी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. 022-22852814 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा, असं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केलं.