Dr. Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mills: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला
Dr. Babasaheb Ambedkar Statue (PC-wikimedia commons)

Dr. Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mills: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा आयोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीन वाजता पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, निमंत्रणाच्या वादावरून हा कार्यक्रम आज रद्द करण्यात आला. यासंदर्भात एमएमआरडीएने माहिती दिली आहे.

दरम्यान, आज दादरच्या इंदूमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार होता. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजीचे सूर उमटत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं. निमंत्रण नसल्याने बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, अखेर एमएमआरडीएकडून आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं. (हेही वाचा -Nitin Raut Tested Covid-19 Positive: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना व्हायरसची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळ्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. मात्र, मंत्र्यांना याची माहिती दिली नसल्याने त्याच्यामध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोललं जातयं. दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं की, मला निमंत्रण आलं नव्हतं. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया वातावरण तयार झालं. त्यानंतर एमएमआरडीएने पत्र पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं. एमएमआरडीएच्या कामावर प्रश्न उपस्थित केल्याने ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पायाभरणी सोहळा एवढ्या घाईने उरकरण्याची गरज काय होती, असा प्रश्नही आनंदराज आंबेडकर यांनी विचारला आहे.

याशिवाय रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही, यावर आमची नाराजी असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार पायाभरणीवरुन राजकारण करत असल्याचा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे.