सोलापूर जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या 6 सदस्याचे निलंबन करण्यात आले. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील 2 सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर (Ajit Pawar) कारवाई करा. त्यानंतर आमच्या सदस्यांना निलंबित करा,' अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटलांनी केली (Vijaysingh Mohite Patil) आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवरही कोणतीही कारवाई का झाली नाही? असे अनेक प्रश्न जयसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. (हेही वाचा - गाईच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे नकारात्मक विचार निघून जातात; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा अजब दावा)
सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 31 डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मतदान झाले होते. परंतु, यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परंतु, आता या कारवाई विरोधात विजयसिंह मोहिते पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.