Symbolic Helmet Day: पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी हेल्मेट घालणे बंधनकारक; प्रशासनाने जारी केल्या सूचना
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील अनेक शहरांमध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट (Helmet) घालणे बंधनकारक असले तरी, पुण्यात (Pune) सध्या हा नियम बंधनकारक करण्यात आलेला नाही. मात्र प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे यासाठी पुणे वाहतूक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याबाबत जनजागृतीही केली जात आहे. आता 24 मे रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी ‘प्रतीकात्मक हेल्मेट दिन’ (Symbolic Helmet Day) पाळण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, सर्व शाळा, महाविद्यालये आदी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

देशात दररोज सुमारे 411 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी 80 टक्के लोक हे दुचाकीस्वार, पादचारी आणि सायकलस्वार आहेत. हेल्मेट घातल्याने दुचाकी अपघातात वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.

शाश्वत वाहतूक या थीमवर 15 ते 21 मे दरम्यान 7 वा संयुक्त राष्ट्र जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे. या अंतर्गत अशासकीय संस्था, सरकारी संस्था, प्रसारमाध्यमे, नागरिक यांचे लक्ष वेधून रस्ते अपघात रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ देणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार, भारतातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. यासोबतच मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरावे असे सांगितले गेले आहे.

याअंतर्गत जनजागृतीसाठी या सप्ताहादरम्यान ‘प्रतिकात्मक हेल्मेट दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याच्या सूचना द्याव्यात, दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिक जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Palghar: पालघरमध्ये मोटारसायकल आणि कारच्या धडकेत 2 ठार)

दरम्यान, पुण्यात हेल्मेट सक्तीसाठी यापूर्वी प्रयत्न झाले होते, मात्र प्रचंड विरोध आणि लोकांच्या असहकारामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, मात्र ज्याप्रकारे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ते पाहता हेल्मेट सक्तीचे करणे गरजेचे वाटते.