
पुणेकरांची वाहतूककोंडी मधून सुटका करण्यासाठी आता मेट्रोचं जाळं निर्माण केलं जात आहे. यामध्ये स्वारगेट-कात्रज अंडरग्राऊंड स्टेशन (Swargate-Katraj Metro Extension) मध्ये अजून दोन स्थानकं वाढवण्यात आली आहेत. त्यासाठी महा मेट्रो कडून सुधारित टेंडर जारी केले आहे. आता सरकार कडून अजून दोन स्थानकांच्या उभारणीचा खर्च केला जाणार असल्याचं सांगण्यात आल्याने पुणेकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वारगेट कात्रज अंडरग्राऊंड मार्ग वाढवण्यासाठी मागील वर्षी काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी माती परीक्षणाचे प्रारंभिक काम झाल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही.
4 महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या 5.46 किमीच्या अंडरग्राऊंड मेट्रोच्या निविदेत बिबवेवाडी आणि बालाजीनगर येथील स्थानकांचा समावेश नव्हता, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचा विरोध झाला. लोकांच्या मागणीला प्रतिसाद देत, पालकमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही स्थानके जोडण्याची शिफारस केली.
महा-मेट्रोने 11 एप्रिल रोजी फेज 1 मधील मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज, फेज 2 मधील बिबवेवाडी आणि बालाजी नगर येथील भूमिगत स्थानकांचे डिझाइन आणि बांधकाम तसेच संबंधित बोगद्यांची सुधारित निविदा जारी केली. निविदांचे मूल्यांकन झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांत बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. Pune Metro Expansion: पुणेकरांना दिलासा! मुरलीधर मोहोळ यांनी मांडले Katraj-Hinjewadi आणि Kharadi-Airport मेट्रो मार्गांचे प्रस्ताव .
मूळ सविस्तर प्रकल्प अहवालात फक्त तीन स्थानके प्रस्तावित असल्याने, बिबवेवाडी आणि बालाजी नगर स्थानकांच्या समावेशामुळे निधीबाबत चिंता निर्माण झाली. दोन नवीन स्थानकांमुळे प्रकल्पाचा खर्च 683 कोटी रूपयांनी वाढल्याने, राज्य सरकारने हा अतिरिक्त खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. बिबवेवाडी आणि बालाजी नगर या स्थानकांच्या समावेशामुळे दक्षिण पुण्यातील रहिवाशांना मोठा फायदा होईल, शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे.