Pune Metro (PC - Wikipedia)

पुणे (Pune) शहर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असून, वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतुकीचे सुकर व्यवस्थापन करण्यासाठी पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. सध्या पुण्यात मेट्रोचे- पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (लाइन 1- रेड लाईन) व वनाज ते रामवाडी (लाइन 2- अ‍ॅक्वा लाईन), असे दोन मार्ग कार्यरत आहेत. आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील मेट्रो नेटवर्कच्या विस्तारासाठी काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले आहेत. नवीन प्रस्तावित मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यावर पुणे एक प्रगत आणि वाहतूकसुलभ शहर म्हणून उभे राहील. महत्त्वाचे म्हणजे, मेट्रोचे नियोजन आणि विस्तार योग्य वेळी पूर्ण झाल्यास पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकास अधिक वेगाने होईल.

मुरलीधर मोहोळ यांचे प्रस्ताव-

मोहोळ यांनी खराडी ते पुणे विमानतळ, तसेच कात्रज ते हिंजवडी या नवीन मेट्रो मार्गांची शिफारस केली आहे. याशिवाय, खराडीत एक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब स्थापन करण्याचाही त्यांचा प्रस्ताव आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना डीपीआर प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. यावेळी महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

खराडी येथील मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब चांदणी चौक, वाघोली, निगडी, स्वारगेट, शिवाजीनगर, हिंजवडी, खडकवासला आणि हडपसर येथील रहिवाशांना मेट्रो सुविधेचा वापर करून पुणे विमानतळावर पोहोचण्यास मदत करेल, असे मंत्री म्हणाले. मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मेट्रो प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या उपक्रमांमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

डबल-डेकर फ्लायओव्हर-

वनाझ ते चांदणी चौक मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंत्र्यांनी डबल-डेकर फ्लायओव्हरमधून मेट्रो लाईनचा प्रस्ताव दिला आहे. नळ स्टॉपवरील डबल-डेकर फ्लायओव्हरचा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि वनाझ आणि चांदणी चौक दरम्यान डबल-डेकर पूल देखील आवश्यक आहे, असे ते म्हणाले. (हेही वाचा: Mumbai Roads: मुंबईकरांना दिलासा! शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य करण्याचे BMC चे आदेश; 31 मे निश्चित केली अंतिम तारीख)

पुण्यातील मेट्रो जाळे-

ही सध्याच्या कार्यरत दोन्ही मेट्रो लाईन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. म्हणूनच यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने पुण्यासाठी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी व नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग, अशा दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली होती. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 31.63 किलोमीटर असून, त्यावर 28 स्थानके असतील. या प्रकल्पांची अंदाजित किंमत 9,897 कोटी आहे. तसेच, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. एकूण 23.3 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 23 स्थानके असतील आणि हा मार्ग मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ फक्त 25 मिनिटांपर्यंत कमी होईल. अशाप्रकारे पुणे मेट्रोचे विस्तारणारे जाळे शहराच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.