मुंबईमधून पश्चिम रेल्वे मार्गावरून उत्तर भारतामध्ये प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आरामदायी आणि स्वस्त प्रवास म्हणून रेल्वेची अनेकजण निवड करतात. मात्र अनेकदा मुंबई नजिक असणार्या प्रवाशांना मेल आणि एक्सप्रेससाठी मुंबईतील महत्त्वाच्या स्थानकांवर यावं लागतं. आता हीच गैरसोय लक्षात घेता स्वराज एक्स्प्रेस (Swaraj Express) आणि अजमेर म्हैसूर एक्सप्रेस (Ajmer Mysore AII MYS Express) या पश्चिम रेल्वेवर धावणार्या 2 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनला आज (13 सप्टेंबर ) पासून थांबा पालघर स्थानकांतही (Palghar Satation) देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार 16209 ही अजमेर - म्हैसूर एक्स्प्रेस 13 सप्टेंबर पासून पालघर स्थानकांत रात्री 21.55 वाजता येईल आणि 21.57 वाजता सुटेल. तर म्हैसूर- अजमेर ही 16210 ही ट्रेन रात्री 23.36 वाजता येईल आणि 23.38 वाजता सुटेल. यासोबतच वांद्रे ते वैष्णवदेवी कटरा ही 12471 स्वराज एक्सप्रेस आजपासून पालघर स्टेशनमध्ये सकाळी 9.18 वाजता येईल आणि 9.20 वाजता सुटेल. तर 12472 ही वैष्णवदेवी कटरा ते वांद्रे ही ट्रेन संध्याकाळी 4.18 वाजता येईल आणि 4.20 वाजता सुटेल. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जम्मू कश्मीरमध्ये दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी स्वराज एक्सप्रेसला पालघर स्थानकांत देण्यात आलेला हा थांबा मोठी दिलासादायक बाब आहे.
पश्चिम रेल्वे ट्वीट
Good news for Palghar! Two pairs of mail/express trains have been given halt at Palghar from 13th September, 2019 for the convenience of passengers. pic.twitter.com/z3JO300l6N
— Western Railway (@WesternRly) September 13, 2019
पालघर स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एक मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा दिला जातो. आता यामध्ये अजून दोन गाड्यांच्या जाता- येता प्रवासाला थांबा देण्यात आला आहे. पालघर मधून वसई आणि पनवेलकडे डीझेल मेमू गाड्या देखील रवाना केल्या जातात.