Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलीन केली; भाजपा नेते राम कदम यांचा आरोप
Ram Kadam (Photo Credits: Ram Kadam)

सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाने (Sushant Singh Rajput Death Case) महाराष्ट्रातील राजकारणाने चांगलाच पेट घेतला असून सत्ताधारी आणि विरोधीपक्षात जोरदार आरोप-प्रत्त्यारोप सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केवळ आरोप करू नयेत तर, पुरावे द्यावेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. या मुद्दयावरून भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे, असा आरोप केला आहे. तसेच ठाकरे सरकार हे प्रकरण सीबीआयकडे का सोपवत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांनी केला आहे. हे नव्या पिढीचे विचार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सामनातील सदरात 'एक सुशांत बाकी सगळे अशांत' हा लेख लिहून भाजपावर टीका केली होती. तसेच सुशांतचे त्याच्या वडिलांशी पटत नसल्याचेही म्हटल होते. या सगळ्या प्रकरणावरुन सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलीन केली असा आरोप आता राम कदम यांनी केला आहे, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही- गुलाबराव पाटील

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच सुशांतच्या मृत्यूमागे हिंदी सिनेसृष्टीतील घराणेशाही आणि गटबाजी आहे, अशा बातम्या आणि वक्तव्य येऊ लागली आहे.