Supriya Sule Vs Sunetra Pawar: बारामतीमध्ये होणार नणंद-भावजय लढत? अजित पवार यांच्याकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारीची शक्यता
Supriya Sule Vs Sunetra Pawar (संग्रहित संपादित प्रतिमा)

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघावर चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Constituency) उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सध्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. सुळे या अजित पवार यांच्या चुलत बहिणी आहेत. बारामती मतदारसंघातून त्या तीनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.

मात्र जर का सुनेत्रा पवार यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली गेली, तर बारामतीत नणंद-भावजय अशी तगडी लढत पाहायला मिळणार. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी मोहीम सुरू केली असून, त्यांच्या प्रतिमेने सजलेले प्रचार वाहन परिसरात फिरत आहे. शुक्रवारी सकाळपासून सुनेत्रा पवार यांच्या विविध विकास कामांचा आढावा घेणारा चित्ररथ बारामती शहरात फिरू लागला आहे. वाहनावर सुनेत्रा पवार आणि अजित पवार या दोघांची प्रमुख छायाचित्रे असलेले फ्लेक्स बॅनर लावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. पर्यावरण आणि महिलांशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे यांनी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्रे लिहिली होती. (हेही वाचा: Ashok Chavan on INDIA Alliance: 'इंडिया युती काम करत नाही, लोकांना या ठिकाणी त्यांचे भविष्य दिसत नाही'- भाजप नेते अशोक चव्हाण)

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात बंड केले आणि काका शरद पवार यांची बाजू सोडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले. भाजप-शिंदे सरकारमध्ये त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. अजित पवारांसह इतर अनेक आमदारांनीही आपली निष्ठा बदलली. या सर्व घडामोडींमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे. म्हणूनच सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.