नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची दिली होती ऑफर; शरद पवार यांच्या खुलास्यावर पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
Supriya Sule (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात अखेर सत्तेचा तिढा सुटला असून शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. परंतु त्या आधी सुरु असलेल्या दीड महिन्याच्या राजकीय नाट्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्या दरम्यान अनेक मोठ्या नेत्यांच्या गुप्ता बैठका झाल्या होत्या. त्यातील सर्वात गाजलेली बैठक म्हणजे, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट.

शरद पवार यांनी नुकत्याच एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक घटनांचा उलगडा केलं. त्यात त्यांच्या मोदींसोबतच्या बैठकीवरही त्यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर मोदींकडून देण्यात आली होती.

या ऑफरविषयी सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुकतीच त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील भेट ही दोन मोठ्या नेत्यांची होती. त्या भेटीत मी नव्हते. पंतप्रधानांनी मला मंत्रिपदाची ऑफर देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. महाराष्ट्रात राजकारणाशिवाय व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे असतात. ते कायम जपले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या."

उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्याच नावावर होणार का शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर

दरम्यान शरद पवार यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत असंही म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असं जे काही म्हटलं जातं ते खरं नाही. मात्र त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदं देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपसोबत जायचचं नसल्याने मी ती ऑफर नाकारली."