Ajit Pawar with Parth Pawar | (Photo Credits: Facebook)

अजित पवार ( Ajit Pawar) यांनी भाजपची संगत सोडत आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षासोबत यावे यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी भेट घेतली. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), प्रफूल्ल पटेल ( Praful Patel), सुनील तटकरे (, Sunil Tatkare), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार हे हॉटेल सोफिटेल येथे आज (26 नोव्हेंबर 2019) दाखल झाले होते. यावेळी अजित पवार नेमके कोणाला भेटले, त्यांनी कोणाशी चर्चा केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या हॉटेलमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अवाहनास प्रतिसाद देत अजित पवार पुन्हा एकदा कहो दिलस से राष्ट्रवादी फिर से असे अजित पवार म्हणणार का याबबत उत्सुकता आहे.

परत या परत या अजित दादा परत या

अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, काँग्रेस आणि पवार कुटुंबीय यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरु आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते अजित पवार यांची भेट घेत आहेत. पवार कुटुंबीयांकडूनही अजित पवार यांच्यावर प्रचंड मोठा दबाव टाकला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेत्यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही अजित पवार यांनी परत यावे अशी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीही अजित पवार यांनी परत यावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. (हेही वाचा, उद्याच बहुमत सिद्ध करा, गुप्त मतदान नको, लाइव्ह प्रक्षेपण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ 30 तास)

भाजप कोअर कमेटी बैठकीस अजित पवार यांची उपस्थित

राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे समजण्याची सूतराम शक्यता नाही. याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेले अजित पवार यांनी भाजपची संगत सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे असतानाच अजित पवार हे भाजप कोअर कमेटी बैठकीस उपस्थित असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे अजित पवार हे आपल्या निर्णयावर ठाम राहणार की, दबावाला बळी पडून पुन्हा एकदा 'कहो दिल से.. राष्ट्रवादी फिर से' असे म्हणत पुन्हा परतणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या पक्षांच्या महाआघाडीची एक बैठक मुंबई येथे हॉटेल सोफिटेलमध्ये पार पडत आहे. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच, काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहे. सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिल्यामुळे आता उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व आमदारांना शपथ देऊन बहुमताची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी उघड बहुमताने केली जाणार आहे. त्यामुळे या चाचणीत नेमके काय घडते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या चाचणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही भवितव्य अवलंबून आहे.