Suspended BJP MLA: निलंबीत भाजपा आमदारांना दिलासा मिळणार का? 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Supreme Court (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र विधिमंडळातील निलंबीत (Suspended BJP MLA) 12 भाजप (BJP) आमदारांबाबत येत्या 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) फैसला होण्याची शक्यता आहे. या आमदारांना दिलासा मिळणार की त्यांच्यवरील कारवाईबाबत पुनर्विचार होणार याबातब उत्सुकता आहे. राजकीय वर्तुळातूनही 11 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप आमदारांकडून निलंबन अर्ज मागे घेण्यासाठी दाखल अर्जाची विधानसभा उपाध्यक्षांनीही दखल घेतली आहे. त्यामुळे या बारा आमदारांना पुन्हा एकदा विधिमंडळात प्रवेश मिळतो का हे पाहावे लागणार आहे.

भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व आमदारांना मुंबई आणि नागपूर येथे असलेल्या विधिमंडळ आवारात येण्यासाठी बंदी आहे. ओबीस आरक्षण कायम राहावे यासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावा यासाठी विधिमंडळात ठराव मांडण्यात आला होता. या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडून घमासान चर्चा झाली. त्यानंतर भाजपच्या काही आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या 12 आमदारांना सभागृहाने एक वर्षासाठी निलंबीत केले. (हेही वाचा, No Relief to 12 Suspended BJP MLA: निलंबीत 12 भाजप आमदारांना दिलासा नाहीच, अध्यक्षांकडेच विनंती करण्याचा न्यायालयाचा सल्ला)

निलंबित आमदार 

  • आशिष शेलार
  • अभिमन्यू पवार
  • अतुल भातखळकर
  • जयकुमार रावल
  • राम सातपुते
  • गिरीश महाजन
  • संजय कुटे
  • नारायण कुचे
  • पराग आळवणी
  • हरिश पिंपळे
  • नारायण कुचे
  • कीर्तिकुमार भांगडिया

निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजप आणि हे 12 आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरु असून तारखा पडत आहेत. त्यामुळे या कारवाईला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. आता येत्या 11 तारखेच्या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.