Sulli Deals 2.0: मुस्लीम महिलांना टार्गेट करणाऱ्या ‘Bulli Bai' अॅपची गृहमंत्रालयाने घेतली गंभीर दखल; मंत्री Dilip Walse-Patil यांचे कारवाईचे आदेश
Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

मुस्लिम महिलांना (Muslim Women) टार्गेट करून त्यांचे फोटो 'बुल्ली बाई' (Bulli Bai) नावाच्या सोशल मिडियावर शेअर केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहेत. याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत असताना, आता महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी रविवारी सांगितले की, मुंबई सायबर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि सीआयडी, मुंबई हे GitHub वर होस्ट केलेल्या अॅप डेव्हलपरच्या विरोधातील सायबर गुन्ह्याचा तपास करत आहेत.

कलम 153(A), 153(B), 295(A), 354D, 509, 500 IPC r/w 67 IT कायदा अंतर्गत ट्विटर हँडल धारक आणि बुल्लीबाई अॅप डेव्हलपर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस कठोर कारवाई करतील, असेही वळसे-पाटील म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे बेकायदेशीरपणे डाउनलोड केली आहेत आणि त्यांचे फोटो ऑनलाइन लिलावासाठी ‘बुल्ली बाई’ अॅपवर अपलोड केली आहेत. (हेही वाचा: Sulli Deals 2.0: GitHub वर ‘Bulli Bai' अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना केले टार्गेट; पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रिय व्यक्तींचे फोटो सोशल मिडियावर शेअर)

याआधी साधारण 6 महिन्यांपूर्वी 'सुल्ली डील्स' द्वारे मुस्लिम महिलांच्या फोटोंच्या लिलावाची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर आता असेच दुसरे अॅप 'बुल्ली बाई' नावाने व्यासपीठावर आले आहे. याठिकाणी महिला पत्रकारांसह 100 हून अधिक प्रभावशाली मुस्लिम महिलांच्या फोटोचा 'लिलाव' करण्यात आला होता. या संदर्भात Twitter आणि Github या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ईमेल पाठवले आहेत. त्यांच्याकडून उत्तरे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र सायबर पोलीस आणि मुंबई सायबर सेलने आधीच चौकशी सुरू केली असून या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.’ अशा प्लॅटफॉर्मबाबत लोकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वी, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते की, अशा अॅप्सद्वारे गोळा केलेली माहिती प्रसारित करण्यासाठी विनामूल्य आणि अनिर्बंध प्लॅटफॉर्म प्रदान केल्याबद्दल त्यांनी, सायबर विभागाला GitHub विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.