Nagpur: पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपूर येथे एकाची आत्महत्या, गुन्हे शाखा करणार तपास
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) येथील एका तरुणाने आत्महतम्या करुन जीवन संपवले. या तरुणाच्या आत्महत्येस नागपूर पोलीस असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखेतर्फे (Crime Branch) केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, महेश नामक 35 वर्षीय तरुणाने पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे अपमानीत झाल्याच्या कारणावरुन आत्महत्या (Suicide) केली असा आरोप आहे. नागपूर जिल्ह्यातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मनोज ठवकर (Manoj Thawkar) नामक व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हे नवे प्रकरण पुढे आले आहे. नागपूर येथील महेश राऊत नामक तरुणास चार्ली कमांडो किशोर सेनाड आणि प्रविण आलम यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका मनोरुग्ण व्यक्तीस परिसरातील नागरिक मारहाण करत होते. या मनोरुग्ण व्यक्तीस मदत करण्याच्या भावनेतून महेश राऊत याने पोलिसांच्या 100 नंबरवर कॉल केला. प्राप्त कॉलवरुन पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी महेशला संपर्क करण्यासाठी कॉल केला. परंतू, महेशने तो कॉल गेतला नाही. त्यामुळे फेक कॉल केल्याचा आरोप करत पोलिसांनी महेशला सर्वांसमक्ष मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

महेश राऊत याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, फोन चार्जिंगला असल्यामुळे महेशने पोलिसांचा फोन स्वीकारला नाही. सर्वांसमक्ष त्याला झालेल्या मारहाणीमुळे त्याला अपमानीत वाटू लागले. त्यातून आलेल्या नैराश्येतूनच त्याने आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली. त्यामळे वरिष्ठांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत गुन्हे शाखेद्वारा या प्रकाराची चौकशी करणयाचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिसांनी काल (बुधवार, 4 जुलै) जवळपास 5 जणांचे जबाब नोंदवले आहेत. दोषींवर कारवाई करण्यात यावी असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.