Hingoli Suicide: लग्न जमत नाही म्हणून एका तरूणाने उचलले टोकाचे पाऊल, हिंगोली येथील खळबळजनक घटना
Girl kills self after being harassed | Representational Image (Photo Credits: File Image)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले असताना हिंगोली (Hingoli) येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्न जमत नसल्यामुळे एका तरूणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा (Khandala) परिसरात रविवारी पहाटे घडली आहे. या घटनेची मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली असून पालकवर्गांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गोविंदराव गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सचिन हा आपल्या आई-वडिलांसोबत खंडाळा परिसरात राहायला होता. त्याला मागील काही दिवसांपासून अनेक प्रयत्न करून देखील लग्नासाठी नवरी मिळत नव्हती. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या तरुणाचा लॉकडाऊनमुळे आणखी एकटेपणा वाढला. लग्न जमत नाही आणि त्यात कोरोनाचा काळ या दुहेरी परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या तरुणाने रविवारी पहाटे 2 च्या सुमारास आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे. या सदंर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai: पतीसोबत सेल्फीवरुन वाद; 27 वर्षीय महिलेची धावत्या ट्रेनखाली आत्महत्या

या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके आपल्या पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी घटनास्थळाची पाहाणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबले यांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.