
ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे (Susdhir More) यांचे निधन झाले आहे. घाटकोपर स्टेशनच्या (Ghatkopar Station) रूळांवर त्यांचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. असे मीडीया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, सुधीर मोरे गुरूवार 31 ऑगस्टच्या रात्री आपल्या खासगी अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर स्टेशनच्या फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला आहे. आज दुपारी सुधीर मोरे यांच्या निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 1, 2023
विक्रोळी पार्कसाईट भागातून सुधीर मोरे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पालिकेच्या या प्रभागात शेवटपर्यंत त्यांचे वर्चस्व कायम होते. सध्या त्यांच्याकडे रत्नागिरीच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम वाढवण्यासाठी ते रत्नागिरी जिल्ह्यात दौरा करत होते. अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. यापूर्वी झालेल्या दापोली ,मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र काल अचानक त्यांच्या एक्झिटची बातमी समोर आली आहे.
सुधीर मोरे यांच्या निधनावर शिवसैनिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.