परतीच्या पावसामुळे औरंगाबाद विभागातील पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले. परंतु, आणखीदेखील पाऊस थांबायचे नाव घेत नाही. आज औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. तसेच ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर-मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (हेही वाचा - Cyclone Maha Update: 'महा' चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; मच्छिमार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)
मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन ते चार दिवसांत या विभागात २७ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या ५ दिवसांत मराठवाड्यातील जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी मिलीमीटमध्ये;
औरंगाबाद - ४० मिलीमीटर
परभणी - ३१.६८ मिलीमीटर
हिंगोली २३.७२ मिलीमीटर
नांदेड १७.४३ मिलीमीटर
बीड २८.१० मिलीमीटर
लातूर २६.१४ मिलीमीटर
उस्मानाबाद - १२.४० मिलीमीटर
हेही वाचा - Cyclone Maha Update: अरबी समुद्रात 'महा' चक्रीवादळ, पालघर, ठाणे परिसरात उद्या मुसळधार पावसाची शक्यता
'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून ते आता पश्चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बुधवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे असणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आला आहे. पुण्यामध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.