मुंबई पाणीपुरवठा तलाव । PC: Twitter/BMC

यंदा जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला पण 30 जून पासून सुरू झालेला पावसाचा जोर आता दमदार बॅटिंग करत आहे. मुंबईच्या तलाव क्षेत्रांमध्ये (Catchment Areas Of The Seven Lakes) चांगला पाऊस पहायला मिळाला आहे. मागील आठ दिवसांमध्ये मुंबई तलाव क्षेत्रांत 6% पाणी साठा वाढला असल्याची माहिती TOI च्या बातमीमधून समोर आली आहे. मुंबईची 2 तलावं विहार (Vihar) आणि तुलसी (Tulsi) या धरणांमध्ये मागील 24 तासांत सर्वाधिक पाऊस अनुभवायला मिळाला आहे. विहार मध्ये 119 मीमी तर तुलसी मध्ये 227 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवार, 5 जुलै पर्यंतच्या माहितीनुसार, मुंबईच्या सार्‍या तलावांमध्ये मिळून आता पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये एकूण गरजेच्या 15% पाणीसाठा आहे. दरम्यान रेंगाळलेला पाऊस पाहता मुंबई महानगर पालिकेने मागील आठवड्यात 27 जून पासूनच शहरात 10% पाणी कपात जाहीर केली आहे. पाणीसाठा 9% वर आल्याने त्यांनी हा निर्णय जाहीर करत पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन जनतेला केले आहे. नक्की वाचा:  Mumbai Rain Update: हवामान खात्याकडून 9 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट'; काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची' शक्यता.

जून 2022 मध्ये तलावक्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. सात तलावक्षेत्रांद्वारा मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. दर दिवशी 3800 मिलियन लीटर पाणी पुरवठा केला जातो. 5 जुलैपर्यंत हा पाणीसाठा 2 लाख मिलियन लीटर पर्यंत गेला होता. येत्या दिवसांत तो अधिक वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा 2.74 लाख मिलियन लीटर्स किंवा 19% होता.

भातसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि अप्पर वैतरणा या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा होतो. काल संध्याकाळी बीएमसी चा पवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. पण या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते.