पुढील 24 तासांत मुंबई मध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तीनही मार्गावरील रेल्वे रुळावर, मात्र रस्ते वाहतुकीचा खोळंबा
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

हवामान खात्याने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळासह मुसळधार पावसाने शहरांत अक्षरशः थैमान घातले होते. बीएमसीने (BMC) याबाबत आधीच सतर्क राहण्याचे आवाहन केले होते, मात्र या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मुख्यत्वे वाहतूक व्यवस्थेवर या पावसाचा फार मोठा परिणाम झाला होता. मुंबईमध्ये हार्बर आणि मध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाल्या होत्या. मात्र आता जरा पावसाचा जोर ओसरल्यावर वाहतूक व्यवस्थाही पुन्हा रुळावर यायला सुरुवात झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली असून, गाड्या उशिराने धावत आहेत. मात्र लवकरच ही वाहतूक पूर्वपदावर येईल. हार्बर रेल्वे मार्गावर आधी वाशी-पनवेल वाहतुकीला सुरुवात झाली. त्यानंतर पाठोपाठ सीएसएमटी-वाशी लोकल वाहतुकही सुरु झाली. रस्ते वाहतूक अजूनही धीम्या गतीने चालू आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी 8 वाजता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 ते 48 तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे रविवारी (4 ऑगस्ट) पहाटे 00.10 वाजता निघणारी सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, रविवारी पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे. तर शनिवारी (3 ऑगस्ट) रोजी रात्री 10.45 वाजता सुटणारी सीएसएमटी-एमजीआर चेन्नई सेंट्रल मेलही रविवारी पहाटे 04.00 वाजता सुटेल.