Varsha Gaikwad On Nanded Hospital Tragedy: नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dr. Shankarrao Chavan Government Medical College) व रुग्णालयातील मृतांची संख्या 31 वर गेल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली आहे. वर्षा गायकवाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या गंभीर घटना आहेत. सरकारी आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसते. ही शिंदे सरकारची निव्वळ निष्क्रियता आहे. परिणामी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जबाबदारी स्वीकारावी. ऑगस्ट महिन्यात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 24 तासांत 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. (हेही वाचा -Raj Thackeray On Nanded Hospital Tragedy: तीन इंजिन बसवूनही महाराष्ट्राची तब्येत व्हेंटिलेटरवर; नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी राज ठाकरेंचे सरकारवर टीका)
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकांशी काही देणेघेणे नाही. ते पक्षावर हक्क सांगण्यात आणि सत्तेच्या लालसेपोटी इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या काळात आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. महाविकास आघाडीने चतुराईने परिस्थिती हाताळली. मात्र गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा ढासाळली आहे. हे सध्याच्या सरकारचे अपयश आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी यावेळी नमूद केलं.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, निमशहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती दयनीय आहे. सरकारी रुग्णालये ओव्हरलोड आहेत. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांनी संपूर्ण शहर आणि नागरिक त्रस्त आहेत. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही सरकारची निव्वळ अकार्यक्षमता आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती लागते. परंतु त्यांची सर्व शक्ती आणि इच्छाशक्ती विरोधी पक्षांची शिकार करण्यात आणि फूट पाडण्यात खर्ची पडते. सरकारला लोकांच्या प्रश्नांची किंवा त्यांच्या जीवनाची काळजी नाही, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.