आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका अशी ओळख असणार्या मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक (BMC Election) 2022ला नियोजित आहे. पण इतर महापालिकेच्या निवडणूकांप्रमाणेच त्यावरही कोरोनाचं संकट आहे. पण राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मुंबई महापालिकेला निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार वॉर्डांची पुनर्रचना करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कोरोनाची परिस्थिती पाहून नियोजन करा, असं राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका प्रशासनाला कळवलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे आता पालिकानिवडणूका पाहता मुंबईत सारेच पक्ष तयारीला लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचे 227 वॉर्ड आहेत. यावर मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आता मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येणार का? याची देखील उत्सुकता आहे.
BMC polls will be conducted in January-February if the COVID situation is under control, in case it's not, polls will be postponed: Mumbai Mayor Kishori Pednekar#Maharashtra pic.twitter.com/gPd19SUzHi
— ANI (@ANI) June 1, 2021
दरम्यान काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये असलेल्या कुरबुरी, रवी राजांसह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी पालिका निवडणूकीमध्ये एकला चलो रे चा दिलेला नारा पाहता या निवडणूकांबाबत कमालीची उत्सुकता असणार आहे. तर मनसे आणि शिवसेनेपासून दूर गेलेली भाजपा काय करणार? हे पाहणं देखील गरजेचे आहे. BMC Elections 2022: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना एकटी लढणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट.
महाराष्ट्रासह देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे पण संभाव्य तिसर्या लाटेच्या धोका या वर्षाच्या अखेरीस असल्याने आता त्यामुळे बीएमसी निवडणूकांवरही टांगती तलवार आहे. निवडणूकीच्या वेळेस पुन्हा रूग्णसंख्या वाढल्यास राज्य निवडणूक आयोग त्या त्या वेळेस निर्णय घेईल असेदेखील सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे.