Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की  पुढील चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस असेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 19 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहून मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडेल. तर 16 नोव्हेंबर रोजी उस्मानाबादमध्ये पाऊस पडेल. 17 नोव्हेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता मराठवाड्यातील हवामान तज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. (हे ही वाचा Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी निमित्त पंढपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते पार पडली.)

पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी लागली होती त्यामुळे पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त जमलेल्या भाविकांनाही पावसामुळे अडचण निर्माण झाली. पंढरपूरसह आसपासच्या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला.