महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Employees) राज्यभर आंदोलन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु असूनही, यावर काही तोडगा निघाला नाही. आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यांना न जुमानता गेल्या तीन दिवसांत केवळ 339 निलंबित कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. एमएसआरटीसीचा संपाचा आज 14 डिसेंबरला 49 वा दिवस आहे.
सोमवारी 92,266 कर्मचाऱ्यांपैकी 21,370 कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले, तर 68,178 कर्मचारी संपावर राहिले. काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 2,639 बस सेवा पूर्ण झाल्या आहेत, तर 250 पैकी 125 बस डेपो अंशतः कार्यरत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कामगारांना सोमवार, 13 डिसेंबरपर्यंत कामावर रुजू होऊन आंदोलन मागे घ्यावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे, असे सांगितले होते. (हेही वाचा: राज्यात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना बसणार जबरदस्त फटका)
तसेच कामावर रुजू झाल्यानंतर तातडीने कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. परब पुढे म्हणाले की, जिथे 50 टक्क्यांहून अधिक डेपो सुरू आहे, कर्मचाऱ्यांना त्याच डेपोत नोकरी दिली जाईल. पण जिथे तेवढे कामगार नसतील तिथे त्यांना जवळच्या डेपोत सामावून घेतले जाईल. मात्र कर्मचारी कामावर आले नाहीत, तर सोमवारनंतर कडक कारवाई होऊ शकते.
संपात सहभागी झाल्याबद्दल परिवहन संघटनेने आतापर्यंत 10,180 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून 2,029 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. एमएसआरटीसीचे कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर आहेत आणि सरकारी कर्मचारी म्हणून लाभ मिळण्याच्या आशेने ते राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी करत आहेत. 9 नोव्हेंबरपासून राज्यातील जवळपास सर्व 250 बस डेपो बंद ठेवण्यात आले असून, राज्याच्या अंतर्गत भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा जवळपास ठप्प झाली आहे.