महाराष्ट्र: राज्यात नव्या केंद्रिय मोटार कायद्याची अंमलबजावणी (Central Motor Vehicle Act) करण्यात येणार असून यासंदर्भातील निर्णय परिवहन विभागानं घेतला आहे, त्यामुळे आता बेशिस्त वाहन चालकांना जबर फटका बसणार आहे. जर वाहन चालका नियमाचे उल्लघंण करताना पकडले गेल्यास त्यांना सात ते आठपट जास्तीचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आता वाहन चालकांनसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. वाहनचालक नियमाचे उल्लघंण करण्याचे टाळतील आणि अपघाताला आळा बसेल अशी अपेक्षा या नव्या नियमावली मधुन केली जात आहे. परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2021 ला अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच ही अधिसूचना काल सोमवारी म्हणजेच, 13 डिसेंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उंल्लघन केल्यास पूर्वी 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तुम्ही जर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या वेळेस 500 रुपये तर दुसऱ्या वेळेस 1500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. परवाना नसताना वाहन चालवल्यास आता तुम्हाला तब्बल 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी परवाना नसताना वाहन चालवण्यासाठी केवळ 500 रुपयांची तरतूद होती. जर तुमच्याकडे वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता ही रक्कम वाढून 5 हजार इतकी करण्यात आली आहे. (हे ही वाचा MHADA Exams: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा; 'म्हाडा भरती परीक्षा आता TCS च्या मदतीने'.)
कारण नसताना हॉर्न वाजवल्यास पूर्वी 200 रुपयांचा दंड होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता विनाकारण हॉर्न वाजल्यास पहिल्यावेळी पाचशे तर दुसऱ्यावेळी तब्बल 1500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. जर तुम्ही विनाहेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास पहिल्यावेळेस 500 रुपयांचा तर दुसऱ्या वेळेला दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. पूर्वी दंडाची ही रक्कम केवळ 500 रुपये इतकी होती.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढंच नाहीतर, तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
राज्यात वाहतूक नियमांचं होणारं उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2021 ला अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच ही अधिसूचना काल सोमवारी म्हणजेच, 13 डिसेंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे.