गेले काही दिवस राज्यातील एस महामंडळाचे कर्मचारी (ST Employees) आणि सरकार यांच्यामध्ये विविध मागण्यांसाठी शीतयुद्ध सुरु आहे. दिवाळीच्या आधीपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. सरकारने यातील काही मागण्या मान्य केल्या आहेत मात्र काहींच्या बाबत दिवाळीनंतर चर्चा होणार आहे. अशात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी डेपोच्या चालकाने आत्महत्या केल्याची घटना अद्याप शांत झालेली नाही. अशा स्थितीत नाशिक जिल्ह्यातील कळवण डेपोच्या बस चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
ही घटना सोमवारी रात्री कळवण आगारात उघडकीस आली. या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारा बस चालक प्रमोद शिवाजी सूर्यवंशी (38, वाजगाव, देवळा) यांच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, चालक प्रमोद सूर्यवंशी हे कळवण आगारात गेल्या काही वर्षांपासून चालक पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते रजेवर होते. त्यामुळे त्यांनी पगारासाठी अर्ज केला होता. मात्र वेळेवर अर्ज मंजूर न झाल्याने त्यांचा केवळ दोन हजार रुपये पगार झाला व दिवाळीसाठी 2500 रुपये मिळाले.
अशाप्रकारे प्रमोद यांना महिन्यात फक्त 4500 रुपये मिळाले. प्रमोद यांच्या घरी आई आणि पत्नी आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार कसे करावे? तसेच दिवाळीत मुलांसाठी कपडे कसे खरेदी करायचे? या चिंतेतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत काही कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी सूर्यवंशी यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर आहे. कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक समाधान नागरे व पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
(हेही वाचा: MSRTC Employee Protest: राज्यात्त एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ऐन दिवाळीत 250 पैकी 38 बस डेपो बंद)
एसटी बस कर्मचाऱ्यांनी असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाबाबत सरकारबाबत नाराजी आहे. गेल्या महिन्यातही एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अनियमित वेतन हे या आत्महत्येमागील कारण होते. राहत्या घरात या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती.