
ST Bus Pass: एसटी महामंडळाने(ST Corporation) शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना(Students) एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के सवलत दिली असून केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास (ST Bus Pass)काढता येणार आहे. त्याबाबतच्या सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. (हेही वाचा:Maharashtra ST Bus To Ayodhya : लालपरी थेट आयोद्धेला जाणार; प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी राज्य परिवहन महामंडळाची नवी योजना )
याशिवाय, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात होते. पण, आता त्यासाठी देखील विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. शाळा- महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार त्यांना एसटीच्या कर्मचाऱ्याकडून एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.