महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) बसला झालेल्या अपघातात तब्बल 50 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील जांभूळपाडा नजीक असलेल्या वाडा (Wada) येथे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. एसटी बस (ST Bus) पिवळी येथून वाडाच्या दिशेने जाताना हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एसटी बस नेहमीप्रमाणे पिवळी गावातून वाडा गावाच्या दिशेने निघाली. या बसमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर काही शाळांमधील विद्यार्थी होते. दरम्यान, अत्यंत भरधाव वेगाने निघालेली ही बस पालघर जिल्ह्यातील जांभूळ पाडा येथील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावर आदळली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. (हेही वाचा, एसटी बस उशीरा पहोचणार असल्ल्यास प्रवाशांना मिळणार माहिती; राज्य परीवहन विभागाचा अनोखा उपक्रम)
दरम्यान, एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जखमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या अपघातात अनेक विद्यार्थ्यांना जबर मार लागला असून, काही विद्यार्थी फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. काहींची प्रक्रृती गंभीर असल्याचेही समजते. दरम्यान,सर्व जखमींना वाडा ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती.