इगतपुरी स्टेशनवर 11-13 जानेवारी दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक,  मुंबई -भुसावळ गाडी रद्द
Indian Railways (Photo Credits: PTI)

Igatpuri Station Traffic and Power Block:  मध्य रेल्वेवर इगतपुरी (Igatpuri) रेल्वेस्थानकावर पादचारी पूल आणि 24 डब्ब्यांच्या गाड्या थांबाव्यात याकरिता रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवार ते रविवार म्हणजे 11 ते 13 जानेवारी या दिवसाच्या कालावधीमध्ये खास पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

इगतपुरी स्थानकावरील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यासाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आजपासून हा पॉवर ब्लॉक पहाटे 3.45 ते मध्यरात्री 10.30 या वेळेमध्ये घेतला जाणार आहे. पॉवर ब्लॉकमुळे तिनही दिवस मुंबई -भुसावळ - मुंबई ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तर इगतपुरी स्टेशनवरून धावणार्‍या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहे.

लवकरच मुंबई ते नाशिक स्थानकादरम्यान लोकल सेवा चालवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. याकरिता लवकरच मुंबई ते नाशिक या स्थानकांदरम्यान रेल्वे चाचणी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी स्थानकावर नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळेसही रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आता पुन्हा पादचारी पूलासाठी गर्डर टाकण्याचं काम हाती घेण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांच्या होणार्‍या गैरसोयीची दिलगिरी व्यक्त करत सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.