Union Budget 2021-22: कोरोनाची लस मोफत करण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 (Union Budget 2021-22) उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काय विशेष असणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर देशात गेले वर्षभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसबाबत आणि त्यावर तयार करण्यात आलेल्या लसीबाबत काय विशेष घोषणा केली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उद्याच्या अर्थसंकल्पात मोफत कोरोना लसीसाठी तरतूद करण्यात यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ABP माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

"लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचाच असतो. देशस्तरावर केंद्र सरकारने राबवायचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर मोफत लसीकरण करावं हे अपेक्षितच आहे आणि ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे" असे राजेश टोपे म्हणाले.

"उद्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, यामध्ये मोफत लसीकरणाची तरतूद जरुर करावी. ज्या ज्या लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे, त्यांचं लसीकरण करण्याची तरतून केंद्र सरकारने करावी," असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.हेदेखील वाचा- Union Budget 2021-22: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सध्याचे इनकम टॅक्स, रीबेट्स आणि 2020-21 आयकर दरांबद्दल जाणून घ्या अधिक

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 2585 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,26,399 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 51,082 वर पोहोचला आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.19% झाले आहे. राज्यात आज 1670 रुग्ण बरे झाले असून एकूण 19,29,005 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारी) आर्थिक वर्ष 2021-22 साठी केंद्राचे बजेट सादर करणार आहे. त्यांचे हे तिसरे बजेट असणार आहे. दोन अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांचे यंदाचे बजेट बहुतांशी महत्वाचे आणि ऐतिहासिक असणार आहे. प्रत्येक वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षाचे अर्थसंकल्प फार महत्वाचे असणार आहे. या मध्ये श्रीमंतांपासून ते सामान्य नागरिकांकडे लक्ष दिले जाईल.