Sachin Waze (Photo Credits: ANI)

मनी लॉडरिंग प्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार (Approver) होण्याचा अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात आज सुनावणी दरम्यान आता सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे.

आज व्हीसी द्वारा हजर असलेला सचिन वाझे 7 जूनच्या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष हजर राहणार आहे. तसे निर्देश आज कोर्टाकडून देण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये सचिन वाझे नियमित जामीनासाठी देखील अर्ज करणार असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. नक्की वाचा: Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन बारमधून पैसे उकळले, सचिन वाझे याची चांदिवाल आयोगाला महिती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप सचिन वाझेने केला आहे. आता 100 कोटीच्या वसुलीच्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांविरुद्ध सचिन वाझे कोणते पुरावे देणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून अनिल देशमुखांनी बार आणि रेस्टॉरंट्स मधून 100 कोटी वसुल करण्याचे लक्ष्य दिल्याचा खळबळजनक आरोप केले होते. अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर करत आणि कनिष्ठ पोलिस कर्मचार्‍यांना हाताशी धरून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसूल करून 4 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम जमवली आणि नागपूर मध्ये असलेल्या त्यांच्या  शिक्षणसंस्थेत वळवल्याच्या आरोपाखाली ईडीने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

सचिन वाझे सध्या मनसुख हिरेन हत्याकांड आणि मुकेश अंबानीच्या घराखाली जिलेटीन कांड्या ठेवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे.