सोनू सूद, तू संजय राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष कर; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे ट्वीट
Sanjay Raut, Sonu Sood, Chitra Wagh (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुर-कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावा लागले आहे. या कठिण परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा मजुरांच्या मदतीसाठी धावून आला होता. सोनूने लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुर-कामगारांना त्यांच्या-त्यांच्या घरी पोहचवण्याचे काम केले. परंतू, त्याच्या या कामामागे कुठली तरी यंत्रणा काम करते आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपचे नाव न घेता सोनू सूदला थेट भाजपशी जोडले गेले. या आरोपावरून भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक मजुरांना गावी जाण्यासाठी बसची सोय करुन दिली होती. सोशल मीडियावर सोनू सूदच्या या कामाचे खूप कौतुक झाले होते. मात्र, संजय राऊत यांनी सोनू सूदच्या या कृतीमागे राजकीय डाव असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अकार्यक्षम आहे, हे दाखवण्यासाठी काही भाजप नेत्यांच्या मदतीने सोनू सूदच्या कामाला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक क्रिकेटपटू व सेलिब्रिटींनी मदत केली. पण त्यांचे हे दान गुप्तच राहिले. कारण, हे सर्व लोक प्रायोजित नव्हते, अशी टीकाही राऊत यांनी केली होती. यावरून चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगले काम करत आहेस. लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. हे देखील वाचा- चांगलं काम करणारे सर्वचं जण भाजपचे आहेत असं शिवसेनेला वाटत असेल, तर त्यांचे आभार; देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका

चित्रा वाघ यांचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण देखील तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंज देत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांच्या मनात भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे.