शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीची तारीख झाली फायनल; पाहा कुठे आणि कधी होणार त्यांच्यात चर्चा?
Sonia Gandhi, Sharad Pawar (Photo Credits: PTI)

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र यायची तयारी दाखवल्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

काल झालेल्या तिन्ही पक्षांच्या बैठकीला किमान सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान सामायिक कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असून तो तिन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, उद्या तिन्ही पक्षांतील नेते राज्यपालांना राजभवनावर भेटायला जाण्याची शक्यता आहे.

यात महत्त्वाची ठरणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी (Sharad Pawar Sonia Gandhi meeting) यांची होणारी भेट. टीव्ही 9 वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात तीन दिवस सलग बैठका होणार आहेत. आणि त्या बैठकीची तारखा असणार आहे 17, 18 आणि 19 नोव्हेंबर. या तिन्ही बैठका दिल्लीत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या बैठकांसाठी शरद पवार 17 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सोनिया गांधी आणि शरद पवार यांची पहिली बैठक होईल.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीला दोन्ही पक्षांतील इतर महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहतील. काँग्रेस पक्षाकडून अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहू शकतील.

शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांनी मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ; सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार?

दरम्यान मुख्यमंत्रिपद कोणाकडे याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल.