महाराष्ट्र विधिमंडळाचे गेले पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले माजी आमदार, ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक (Sudhakar Paricharak) यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. श्वसनाच्या विकारामुळे त्यांचे निधन झाले. राजकारण, सहकार आणि समाजकारण या क्षेत्रात सुधाकरपंत परिचारक (Sudhakar Pant Paricharak) यांनी भरीव काम केले. सोलापूर जिल्ह्यात ते मालक या नावाने ओळखले जात. पुणे येथे सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. आज (मंगळवार, 18 ऑगस्ट 2020) सकाळी पुणे येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुधाकर परिचारक यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. काही दिवसांपासून त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. दरम्यान, त्यांची कोरोना व्हायरस चाचणी केली असता ती पॉझिटव्ह आली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठ दाखल करण्यात आले होते.सुधाकरपंत परिचारक यांचे नातू आणि प्रशांत परिचारक यांचे पुत्र प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्याबाबत माहिती दिली होती. (हेही वाचा, Shivajirao Patil Nilangekar Passes Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन)
सुधाकर परिचारक अल्पपरिचय
- महाराष्ट्र विधानसभेत 25 वर्षे सदस्य
- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घ काळ जबाबदारी
- सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान
- बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम
- काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख
- कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाकडून उमेदवारी
दरम्यान, सुधाकरपंत परिचारक यांच्याव पुणे येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्याची कोरोना संकटकाळ स्थिती पाहता कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी. कार्यकर्त्यांनी तसेच परिचारक यांना माणणाऱ्या असंख्य चाहत्यांनी संयम बाळगावा. असे अवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहे.