सोलापूर (Solapur) मधील मेटकरी कुटुंबियांच्या सर्जा (Sarja) मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. निमोनिया (Pneumonia) झालेल्या सर्जावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो अडीच वर्षांचा नर मेंढा होता. यावर मेटकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील सदस्य गमवाल्याची त्यांची भावना आहे. विशेष म्हणजे या मेंढ्यावर 71 लाखांची बोली लागली होती. सर्जा मेंढा माणदेशाची शान आणि भूषण म्हणून ओळखला जात होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात 'हिंदकेसरी' म्हणून तो नावाजला गेला होता.
बाबुराव मेटकरी यांचा हा मेंढा होता. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या येथील चांडोलेवाडीत मेटकरी कुटुंबिय वास्तवास आहे. सर्जा मेंढा मेटकरी कुटुंबाला वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देत होता. मेटकरी कुटुंबियांनी देखील अगदी घरातील सदस्याप्रमाणेच त्याची काळजी घेत त्याला वाढवला होता. (World's Most Expensive Sheep: तब्बल साडेतीन कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी मेंढी Double Diamond; स्कॉटलंडच्या लिलावात तीन शेतकऱ्यांनी केली खरेदी)
सर्जा हा माडग्याळ जातीच्या अत्यंत डौलदार मेंढा होता. त्याला लाखोंची मागणी होती. आटपाडीच्या जत्रेत त्याच्यावर 71 लाखांची बोली लागली होती. सर्जाची अजस्त्र देहयष्टी, देखणं रुप होतं. त्याचं पोपटाप्रमाणे असलेलं नाक त्याचं सौंदर्यस्थळ मानलं जात होतं. दरम्यान, 3-4 दिवसांपूर्वी त्याला निमोनियाचा संसर्ग झाला. त्याच्यावर उपचारही सुरु होते. त्याचा जीव वाचवण्यासाठी मेटकरी कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यापूर्वी सोलापूरमध्ये अनेक मेंढे मोठ्या किंमतीत विकले गेले आहेत. मागील वर्षी कल्लपा यांचा विजापुरी जातीचा मेंढा साडेआठ लाखांना विकला गेला होता. त्यामुळे मेंढीपालन व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं, हे आता सिद्ध झालं आहे.