Solapur: मळणी यंत्र ठरले जीवघेणे, सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
Death (Photo Credits-Facebook)

सेवानिवृत्तीनंतर शेती व्यवसायात रमलेल्या बँक अधिकाऱ्याचा मळणी यंत्रात (Threshing Machine) अडकून मृत्यू झाला आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे ही धक्कादायक घटना घडली. भास्कर पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जात होते. बँकींग क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर पूर्णवेळ शेतकरी म्हणून ते कार्यरत होते. पवार यांनी आपल्या शेतात सोयाबीन (Soybean) पिकवले होते.सोयाबिनची मळणी करताना मळणी यंत्रात अडकून पवार यांचा मृत्यू झाला.

सोयाबीनच्या मळणीसाठी पवार यांनी मळणी यंत्र शेतात आणले होते. पवार हे मळणी यंत्रामध्ये सोयाबीनचा घास सरकवत होते. दरम्यान, अंदाज न आल्याने पवार यांचा हात मळणी यंत्रात अडकला. पवार यांच्यापेक्षा मळणी यंत्राची शक्ती अधिक असल्याने पवार यांना हात मागे खेचता आला नाही. परिणामी पवार हे मशिनमध्ये खेचले गेले. (हेही वाचा, Pune: पैशावरुन झालेल्या वादातून पतीकडून पत्नीची हत्या; घराशेजारी पुरला मृतदेह)

मशिनमध्ये शरीर अडकल्याने पवार यांच्या वरच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. अपघात घडत असल्याचे ध्यानात येताच सोबतच्या शेतकरी आणि कुटुंबीयांनी मशीन तत्काळ थांबवले. मात्र, तोवर फार उशीर झाला होता. पवार यांच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्यांचे कमरेवरचे शरीर पूर्णपणे मशिनमध्ये अडकले होतो. कष्टाने पिकवलेले सोयाबीन हातातोंडाशी आले होते. हे पीक उत्पादनासाठी अंतीम टप्प्यात होते. दरम्यान, पवार यांच्यासोबत अत्यंत भयावह घटना घडली. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या आधीही अनेक शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. कधी सर्पदंश, कधी विजेचा धक्का लागून, कधी विज कोसळून तर कधी पाण्यात बुडून शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शेतीचे काम करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि जीवावर बेतणार नाही अशाच पद्धतीने करण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात, अपघाताच्या घटना अपवादात्मक असतात.