पैशांवरुन झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना पुण्यातील (Pune) दौंड (Dound) येथे घडली आहे. हत्या करून आरोपीने पत्नीचा मृतदेह घराशेजारीच पुरला होता. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. रमेश सुंदर वाघमारे (30) असे या आरोपीचे नाव आहे. (Rajasthan Shocker: मुलाच्या हव्यासापोटी पत्नीची हत्या, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक)
रमेश आणि त्याची पत्नी माया दौंड तालुक्यातील वखारी गावच्या हद्दीत पिरबाबा दर्गाजवळ राहत होते. पैशाच्या देवाणघेवाणीवरुन त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे संतापलेल्या रमेशने पत्नीला बेदम मारहाण केली. जबर मारहाणीमुळे माया जबर जखमी झाली. त्यानंतर त्यातच यात तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून रमेश हादरुन गेला. आता नेमके काय करावे, हे त्याला सुचत नव्हते. त्यानंतर त्याने घराशेजारीच मोठा खड्डा खणून त्यात पत्नीचा मृतदेह पुरला.
दरम्यान, रमेशचे मित्र आणि कोळसा व्यापारी नितीन सुरेश ठोंबरे हे कामानिमित्त रमेशच्या घरी आले. त्यांनी बायको कुठे आहे? अशी चौकशी केली. यावेळी 'मी तिला मारुन टाकले', असे तो म्हणाला. सुरुवातीला त्यांना ही गंमत वाटली. मात्र त्यानंतर रमेशने आपल्या हातून गुन्हा घडल्याचे सांगितले.
हे समजताच नितीन ठोंबरे यांनी यवत पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत आरोपीची चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.