Solapur: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यात प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
Murder (Photo Credit - File Photo)

तब्बल दोन वर्षांपूर्वी प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस सोलापूर येथील बार्शी सत्र न्यायालयाने (Barshi Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महेश मिसाळ असे या दोषीचे नाव असून लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यात त्याने पत्नीची हत्या केली. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. लग्नापूर्वीच नात्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र गर्भवती पत्नीचा अडसर होत असल्याने तिचा खून केल्याचे दोषीने सांगितले. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. परंतु, परिस्थितीजन्य पुरावे सादर केल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबाद येथील मनिषा फुगारे आणि महेश मिसाळ यांचा 7 मे 2017 रोजी विवाह झाला. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. लग्नानंतर आपला पती एका महिलेशी फोनवर सतत बोलत असल्याची तक्रार तिने माहेरी केली होती. दरम्यान, 2 जानेवारी 2018 रोजी महेश अचानक मनिषाला घेऊन सासुरवाडीला दाखल झाला. त्यानंतर संध्याकाळी परत येत असल्याचे सांगून पुन्हा तो मनिषाला घेऊन बार्शी येथे आपल्या बहिणीकडे गेला. मात्र खूप उशीर होऊनही मुलगी आणि जावई परतले नसल्याने सासऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचेही फोन न लागल्याने सासरे त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर पडले. तेव्हा त्यांना येरमाळ्याजवळ रस्त्याच्या कडेला जावयाची दुचाकी पडलेली आढळली आणि शेजारी मनिषाचा मृतदेह पडलेला होता. मात्र त्या ठिकाणी जावई न दिसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर जावई उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल असल्याचे कळले. (ठाणे: प्रियकरासोबतचा Nude Video पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या नवऱ्याकडून बायकोची हत्या)

याबाबत विचारणा केली असता चित्रपटाला साजेशी अशी कथा रचत महेश याने सांगितले की, प्रवासादरम्यान चोरट्यांनी हल्ला केला. त्यात मी जखमी झालो तर मनिषाचा मृत्यू झाला. मात्र महेशच्या अंगावर अगदी किरकोळ जखमा तर मनिषाच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांना ही बाब संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत प्रेयसीसोबत लग्न करण्यास अडसर ठरत असल्याने दगडाने मारुन आणि चाकूहल्ला करुन पतीचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले.