महाविकास आघाडीने जळगाव आणि सांगली मध्ये महापालिकेच्या निवडणूकीमध्ये भाजपाला धक्का देत सत्तापरिवर्तन घडवून आणले होते आता त्याचीच पुनरावृत्ती सिंधुदुर्गात आज होणार का? याकडे राज्यातील अनेकांचं लक्ष लागलं होतं पण राणेंचा बालेकिल्ला समजला जाणारा सिंधुदुर्ग (Sindhudurg) अभेद्य ठेवण्यास राणे पिता-पुत्रांना यश आले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूकीमध्ये (Sindhudurg ZP President Election) भाजपाच्या (BJP) संजना सावंत (Sanjana Sawant) यांची निवड झाली आहे. दरम्यान या निवडणूकीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा होती पण तसे झालेले नाही.
50 सदस्य असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 31, तर शिवसेनेचे 19 सदस्य होते. भाजपाकडे अधिक संख्या असली तरीही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता होती त्यामुळे दिल्लीतील संसदेचे अधिवेशन सोडून राज्यसभा खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते. राणे पिता-पुत्रांनी आखलेली रणनीती त्यांनी यशस्वी पार पाडली आहे. राणे समर्थक असलेल्या भाजपच्या समिधा नाईक यांनी अध्यक्षदाचा राजीनामा दिल्याने आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेत शिवसेना विजयाचा 'सांगली पॅटर्न', भाजपची सत्ता गेली; गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले.
नितेश राणे ट्वीट
— nitesh rane (@NiteshNRane) March 24, 2021
राणेंच्या गोटातून शिवसेनेमध्ये गेलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती मात्र नितेश राणेंनी जातीने स्वतः प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवले होते. काही नाराजांची मनधरणी करण्यामध्ये त्यांना यश आल्याचं बोललं जात होतं आणि अपेक्षेप्रमाणे राणेंनी भाजपाच्या उमेदवाराला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसवले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूकीचा इतिहास पाहता नारायण राणे ज्या-ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षाची सत्ता येथे राहिली आहे. आता देखील राणेंमुळेच पहिल्यांदाच भाजपची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे.