Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजप आमदार असलेल्या नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या कणकवली मतदारसंघात सभा घेणार आहेत. ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष राज्याला नवीन नाही. त्यातच नुकत्याच घडलेल्या शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण, जिल्हा बँक निवडणूक निकाल, नितेश राणे अटक या सर्व प्रकरणांनंतर आदित्य हे प्रथमच कोकण दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सहाजिकच आदित्य यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रसारमाध्यमांतूनही या दौऱ्याला महत्त्व दिले जात आहे. दरम्यान, चिपी विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना नितेश राणे यांच्या मतदारसंघात सभा घेत असल्याबाबत विचारले.

आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, 'मतदारसंघ कोणताही असो. कोणाचाही असो. शक्य तिथे जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं ही प्राथमिकता असते', असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य हे आजच्या दौऱ्यात देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी जाऊन ते विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. (हेही वाचा, Kirit Somaiya यांना रोखण्यासाठी रत्नागिरीत पोलिसांची नोटीस; सोमय्या विरोध झुगारत दापोलीकडे रवाना)

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून महाविकासआघाडीतील नेत्यांनी राज्यभरातील आपले दौरे वाढवले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय आणि केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नेत्यांकडून हे दौरे आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे रत्नागिरी येथील खेड आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे चिपळून दौऱ्यावर आहेत.