सिल्वर ओक: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यात दोन तास चर्चा
Supriya Sule,Parth Pawar,Sharad Pawar | ant Singh Suicide Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पार्थ पवार (Partha Pawar) यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर मोठ्या हालचाली घडत आहेत. सुरुवातील उपमुख्यमंत्री अजित पवार 'सिल्वर ओक' वर दाखल झाले. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात एक बैठक पार पडली. स्वत: पार्थ पवार हेसुद्धा 'सिल्वर ओक' वर दाखल झाले. या वेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्याचे समजते. ही चर्चा गुरुवारी (13 ऑगस्ट) रात्री पार पडली.

दरम्यान, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यातील चर्चेचा नेमका तपशील अद्याप बाहेर आला नाही. मात्र राजकीय वर्तुळात मात्र या बैठकीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या चर्चेत शरद पवार यांनी कानउघडणी केली असावी असे काहींचे मत आहे. तर काहींना वाटते पक्ष, पक्षाची भूमिका आणि पक्षशिस्त याबाबात बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या असतील. (हेही वाचा, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवारच्या CBI चौकशीच्या मागणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया )

पार्थ पावार हे असमंजस (इमॅच्युअर) आहेत. त्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारले होते. पवार यांच्या फटकारण्यास पार्थ पवार यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांची पार्श्वभूमी होती. पार्थ पवार यांनी 'अयोध्येत श्री राम. श्रीराम हे भारतीय अस्थेचे प्रतिक आहे. सांस्कृतिक ओळख आहे. आता अयोध्येत ते शांततेने राहतील' अशा आशयाचे एक पत्र ट्विट केले होते. राम मंदिर आणि एकूणच प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आला आहे. इतकेच नव्हे तर उजव्या विचारांचे राजकारण टाळत नेहमी सर्वसमावेशक राजकारणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे राम मंदिराबाबतचे भाष्य पक्षाच्या चौकटीत बसणारे नव्हते.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. पार्थ यांची ही मागणीसुद्धा पक्षाची भूमिका नव्हती. त्यामळे पक्षाची भूमिका नसताना आणि त्यातही राज्याचे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही पार्थ पवार यांनी ही भूमिका मांडली. पार्थ पवार यांच्या दोन्ही भूमिकांमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावर भाष्य करणे आवश्यक होते. राष्ट्रवादीच्या खासदार आणि पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी आणि पक्ष प्रवक्ते नबाब मलिक यांनी शब्दांची कसरत करत यावर प्रतिक्रिया दिली. मात्र, आज खुद्द शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली.