सिद्धिविनायक मंदिर 15 ते 19 जानेवारी दरम्यान राहणार बंद; माघी गणेशोत्सवाची तयारी सुरु
Siddhivinayak Temple (Photo Credits : commons.wikimedia)

यंदा 25 जानेवारी ते 1  फेब्रुवारी दरम्यान माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav 2020) सोहळा पार पडेल. माघी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मुंबईतील प्रभादेवी स्थित सिद्धिविनायक गणेश मंदिरात जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे, या तयारीसाठी गणपतीच्या निमित्ताने पुढील आठवड्यात चार दिवसांसाठी मंदिर बंद असणार आहे. याबाबत सिद्धिविनायक न्यासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवार, 15 जानेवारी ते रविवार 19 जानेवारी पर्यंत मंदिरात गणेश मूर्तीवर सिंदूर लेपनाचा (Sindur Lepan)  कार्यक्रम होणार असून त्या कालावधीत मंदिर बंद असेल.

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अतिशय प्रख्यात गणेश मंदिर आहे, सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या मंदिरात अगदी आवर्जून भेट देत असतात. देशविदेशातून दर मंगळवारी,महिन्यातील संकष्टी ला आणि सहा महिन्यातील अंगारकी चतुर्थीला इथे खास गर्दी होत असते. भाद्रपदातील आणि माघातील गणेशोत्सव सोहळाही मंदिरात अगदी दिमाखात आयोजित केला जातो.

दरम्यान, पुढील आठवड्यातील चार दिवसांच्या नंतर 20 जानेवारीला मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवैद्य आणि आरती झाल्यावर मंदिर नियमित वेळेत वर्षासाठी उघडे असेल.