महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच राज्यातील मृत्यू दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याोचपार्श्वभूमीवर उस्मानाबाद (Osmanabad) येथून सर्वांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. उस्मानाबाद येथे आज तब्बल 23 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीत मोठी गर्दी केली होती. मृताच्या दर्शनासाठी त्यांच्या नातेवाईकांनी स्मशान भुमीच्या कम्पाउंडवर तर, काही जण उंच डोंगरावर उभे राहुन मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा हा प्रयत्न मनाला चटका लावणारा होता. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. स्मशानभूमीत आज जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. एवढेच नव्हेतर, सरण रचण्यासाठी लाकडे कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. आजच्या आकडीवारीनुसार, उस्मानाबाद येथे आज दिवसभरात तब्बल 764 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात 451, तुळजापूर 72, उमरगा 57, लोहारा 17, कळंब 59, वाशी 36, भूम 40 आणि परंडा येथीस 32 रुग्णांची समावेश आहे. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Pune Coronavirus: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुण्यात आरोग्य सुविधांची कमतरता; ससून रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरु
महाराष्ट्रात आज तब्बल 63 हजार 729 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या 37 लाख 3 हजार 584 वर पोहचली आहे. यातील 30 लाख 4 हजार 391 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 59 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे.