महाराष्ट्रातील पुणे (Pune) येथील एका मोठ्या औषध कंपनीवर कोरोना विषाणू लसीचा (Coronavirus Vaccine) फॉर्म्युला चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या एचडीटी बायो कॉर्प (HDT Bio Corp) नावाच्या कंपनीने पुण्यातील Emcure Pharmaceuticals कंपनीवर हा आरोप केला आहे. आता या अमेरिकन कंपनीने एमक्युअर विरोधात 7200 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरून स्वतःची लस बनवल्याचा आरोपांबाबत, एमक्युअर फार्मा कंपनीवर वॉशिंग्टनच्या कोर्टात हा दावा दाखल केला आहे. अमेरिकन कंपनीच्या या कारवाईमुळे फार्मा इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.
एचडीटी बायोने म्हटले आहे की, पुणेस्थित कंपनीने आमचा कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला आहे आणि या चोरीच्या फॉर्म्युल्यापासून लस तयार केली. एचडीटी बायो कॉर्पने 2020 मध्ये Emcure ची उपकंपनी असलेल्या जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्ससोबत एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून संयुक्तपणे कोविड लस विकसित करण्यासाठी करार केला होता. खटल्यात दावा केला गेला आहे की, Emcure ने एचडीटी बायो कॉर्पचा फॉर्म्युला आणि तंत्रज्ञान वापरून लस विकसित केली. एचडीटी बायो कॉर्पने असाही दावा केला आहे की, Emcure ने कथितरित्या चोरीचे तंत्रज्ञान वापरून भारतात दोन पेटंटसाठी अर्ज केला आणि आपली ही ‘स्वदेशी विकसित’ लस सांगून IPO दाखल केला. (हेही वाचा: 31 मार्चपासून हटवले जाणार कोविड-19 शी संबंधित निर्बंध; मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम लागू)
रॉयटर्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘जेनोव्हाने Emcure च्या विनंतीनुसार एचडीटी सोबतचा परवाना करार संपुष्टात आणला आणि त्यांच्या सीईओने एचडीटीला सांगितले की ते लस विक्रीवर रॉयल्टी देणार नाही.’ जुलै 2020 मध्ये एचडीटी बायोने भविष्यात नियोजित कोरोना लसीसाठी मेसेंजर किंवा mRNA तंत्रज्ञान वापरण्याची गरज लक्षात घेऊन जेनोआ बायोफार्मास्युटिकल्सशी करार केला होता. मात्र पुण्यातील या कंपनीने करारातील अटी न पाळता फॉर्म्युला चोरून स्वत:ची लस बनवण्यास सुरुवात केली, असा अमेरिकन कंपनीचा दावा आहे.
दुसरीकडे, Emcure ने हे सर्व दावे फेटाळले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ‘खटल्याचा विषय असलेला, ‘परवाना करार’ हा मुद्दा जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स आणि एचडीटी यांच्यातील बाब आहे. त्याच्याशी Emcure फार्माचा काहीही संबंध नाही.’