Washim Crime: वाशिममध्ये धक्कादायक घटना, पती-पत्नीच्या भांडणात निर्दयी बापाने आपल्या एक वर्षाच्या मुलीला गाडले जिवंत
CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

वाशिममधून (Washim) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या निष्पाप मुलीला जिवंत गाडले आहे. यानंतर त्या मुलीचा वेदनादायक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पती-पत्नीच्या भांडणात आरोपी रागाच्या भरात एवढा निर्दयी झाला की त्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुरडीवर राग काढला आणि तिला खड्ड्यात निर्दयीपणे गाडले, अशी माहिती मिळाली आहे. सुरेश घुगे असे या निर्दयी, बापाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाडी वाकड गावाजवळ हे कुटुंब राहते. सुरेश घुगे याचे आपल्या पत्नी कावेरीसोबत वारंवार भांडणे होत असत. पण पती-पत्नीमधील हा वाद इतका टोकाला जाईल की, एक बाप आपल्या एका वर्षाच्या निष्पाप मुलाला जिवंत गाडण्यासारखे क्रूर कृत्य करेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

आरोपी सुरेश घुगे याला तीन मुली आहेत. त्याला पत्नी कावेरीच्या चारित्र्यावर संशय आहे. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे. सुरेशलाही दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी सायंकाळीही याच कारणावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी कावेरीने शेतातून गावाकडे धाव घेतली. पळून जाऊन तिने आपल्या मेव्हण्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. यानंतर काही लोक शेताकडे धावले. कावेरी त्या निष्पाप मुलीला एकट्याने सोडून पळून गेली होती, जेव्हा तिला मुलगी सापडत नसल्याने, तेव्हा तिने ही गोष्ट गावातील लोकांना सांगितली. (हे ही वाचा Thane: स्विगीचा डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून ठाण्यातील कुटुंबाला लाखो रुपयांना लुटले; गुन्हा दाखल, तपास सुरु)

आपल्याच मुलीची केली हत्या

गावातील लोकांनी सुरेशला त्या मुली बद्दल विचारले असता सुरेशनेच आपल्याच मुलीची हत्या केल्याचे सांगितले. लोकांनी तात्काळ त्या मुलीला खड्ड्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यानंतर ही माहिती रिसोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. रिसोड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुरेश घुगे याला अटक केली.